ब्रेक फेल नाही! तर 'हे' आहे पुण्यातील भीषण अपघाताचे नेमके कारण

पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर झालेल्या अपघातात एका भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिली. या अपघातात गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला असून 

अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सुदैवाने यात कोणाचाही जीव गेला नाही. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं.  

मात्र तपासादरम्यान मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाली नसल्याचं समोर आलं आहे.

अपघात घडल्यानंतर घटनास्थळावरुन ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फरार झालेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. मणिराम छोटेलाल यादव असं या चालकाचं नाव असून, तो मध्य प्रदेशचा आहे.  

पोलिसांनी त्याच्याविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अग्निशमन दल; तसंच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि

हेल्प रायडर्स संघटनेच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. सहाय्यक पोलिस आयुक्त (सिंहगड रस्ता विभाग) सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरटीओने वाहनाची तपासणी केली असता, ब्रेक फेल झालं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.  

प्राथमिकदृष्ट्या चालकाने इंधन वाचवण्यासाठी उतारावर इंजिन बंद करत न्यूट्रल गेअरवर गाडी चालवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. पण नंतर वाहनाने वेग पकडल्याने तो ब्रेक दाबू शकला नाही".